खासदार सुप्रिया सुळे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोमवारी (दि.१९) औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला.
महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून तिन्ही पक्षात नेहमी धुसफुस असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान वरिष्ट नेत्यांकडून महाविकास आघाडीत तीन्ही पक्षात कोणतेही वितूष्ट नसल्याचे वारंवार सांगण्यात आले. परंतू आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफाडी करत असल्याचा आरोप टोपेंनी केला. विशेष म्हणजे टोपेंनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर हा पाढा वाचला.
मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार खुद्द राजेश टोपे यांनी केली. या वेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.