मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये एक धक्कादायक (Kurla Crime) घटना घडली आहे. गर्भवती महिलेची तिच्या दिराने हत्या केली आहे. या घटनेमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी दिराला अटक केली आहे. या घटनेमुळे कुर्ला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वहिणीच्या प्रेमामध्ये बुडालेल्या दिराने हे टोकाचे पाऊल उचलत तिची हत्या केली. गर्भवती महिला बाळंतपणासाठी आपल्या गावी निघाली होती. पण तिच्या दिराने माहेरी जाण्यासाठी विरोध केला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामध्ये संतप्त झालेल्या दिराने आपल्या गर्भवती भावजयची हत्या केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतेदह ताब्यात घेऊन शवविच्छदेनासाठी पाठवला. या घटनेमध्ये महिलेच्या पोटातील बाळाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सोनकर आपल्या पत्नी कोमल आणि चुलत भाऊ अर्जुनसोबत कुर्ल्यामध्ये राहत होता. संजय आणि अर्जुन दोघे कॉटन ग्रीनला एका चहाच्या दुकानामध्ये काम करतात. पण अर्जुन आपल्या वहिणीच्या प्रेमामध्ये बुडाला होता. कोमल गर्भवती होती आणि तिच्या पोटामध्ये संजयचे मुल वाढत होते. ती सात महिन्यांची गर्भवती होती. तिला बाळंतपणासाठी माहेरी जायचे होते. पण अर्जुनला तिला माहेरी जाऊन द्यायचे नव्हते.