राज्यात ठोक बाजारात पेपरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे वह्या-पुस्तके यांच्या किमती शाळा सुरू होण्यापूर्वी दीड महिना शिल्लक असताना सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन पोहोचल्या आहेत. शालेय साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अब्दुल रहमान स्ट्रीट परिसरातील होलसेल व्यापारीही शालेय साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे धास्तावले आहेत.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत वह्या आणि पुस्तकांसोबत शालेय साहित्याच्या विक्रीवर मोठे परिणाम झाले होते. यंदा ही विक्री होईल असे वाटते. मात्र त्यात ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या आपला माल देताना १२ ते १८ टक्के जीएसटी लावून देत असल्याने आम्हाला त्याचा बराच मोठा आर्थिक भार सोसावा लागत असल्याचे मेहरा अँड कंपनीच्या प्रमुखांनी सांगितले; तर मॉडर्न स्टेशनरीच्या प्रमुखांनी जीएसटीपेक्षा सध्या बाजारात वाढलेल्या पेपरच्या भावाचा मोठा फटका येत्या काळात वह्या-पुस्तकांच्या भाववाढीवर होईल, त्यामुळे ग्राहक त्यांना परवडेल अशाच मालाची मागणी करेल, असे सांगितले.
येथील वह्या-पुस्तके आणि इतर स्टेशनरीचे होलसेल व्यापारी महेंद्र जैन म्हणाले की, मागील वर्षी ते ५०० रुपयांच्या दरम्यान नावाजलेल्या कंपन्यांच्या मोठ्या आकाराच्या आणि शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वह्या मिळत होत्या. मात्र मागील काही दिवसांत ठोक बाजारात पेपरचे भाव आणि त्यावर आकारण्यात येणाऱ्या १२ टक्के जीएसटीमुळे नामांकित कंपन्यांनी आपल्याकडील वह्या-पुस्तके यांच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळेच अब्दुल रहमान स्ट्रीट या बाजारात ब्रँड नसलेल्या मोठ्या वह्या ४८० ते ५५० रुपये डझनपर्यंत मिळत आहेत. ब्रँडेड मोठ्या वह्या ७०० रुपये डझन आहेत.