ताजी बातमी ऑनलाईन टीम
यवतमाळ : लालपरी म्हणजेच आपली एसटी आपल्याला नेहमी सेवा पुरवत असते. याच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांवरुन एसटी एवढं मोठं राज्यव्यापी आंदोलन झालं. मात्र स्थानिक पातळीवर काही एर. कर्मचाऱ्यांच्या (St Worker) समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत.
असाच काहीसा प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. एका एसटी चालक पित्याने आपल्या मुलीचा मृतदेह आगारात आणल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. एसटी चालक (St Driver) किशोर राठोड यांची चौदा वर्षाची अंपग मुलगी नेहमी आजारी राहत असल्याने तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याकरिता एसटी चालकाने दिग्रसचे आगार प्रमुख संदीप मडावींना रजा देण्याची विनंती केली. मात्र आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्यामुळे एसटी चालकाची मुलगी उपचारा अभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करित चालकाने चक्क मुलीचा मृत्यूदेह ऑटोने एसटी आगारात आणल्याने मोठी खळबळ उडाली.
मानसिक त्रास देत असल्याचाही आरोप
दरम्यान दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी एसटी आगारात धाव घेत प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी चालक आक्रमक होत आगार व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई जो पर्यंत करणार नाहीत, तो पर्यंत आगारातून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलीसांपुढे ही मोठा पेच निर्माण झाला. उशीरा पर्यंत कोणावरही या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे आगार व्यवस्थापक आणि अन्य दोघे नेहमी चालक राठोड यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभर पोहोचले आहे. या प्रकरणात आता पोलीस काय भूमिका घेताहेत हेही पाहणं तितकचं म्हत्वाचं ठरणार आहे.