बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील अभिनेता मकरंद देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दगडी चाळ 2’ हा चित्रपट मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आता प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा चालू आहे. हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि काही लोकांच्या घोळक्यातून एंट्री मारणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांचा पुन्हा भक्कम आणि जोरदार अभिनय पाहायला मिळणार आहे.
मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांची निर्मिती असलेला चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2) हा चित्रपट यंदाही तगडी कमाई करू शकतो. आता ‘दगडी चाळ 2’ मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुस-या भागाची कथादेखील डॅडीभोवती फिरणार असून कथा काल्पनिक असणार आहे.
दगडी चाळ – 2 चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर यांनी सांगितलं की, “आज आम्हाला ‘दगडी चाळ 2’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी मन भरुन दिलेल्या प्रेम व प्रतिसाद यामुळे आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याची इच्छा आहे.”