ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर,महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घटना घडत आहेत. त्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटत आहेत. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने महापालिका निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सध्या तरी काँग्रेसराष्ट्रवादीविरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातच काटाजोड लढती होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींतून शिवसेना कशी बाहेर पडते? यावर त्यांचे महापालिका लढतीतील स्थान ठरणार आहे.
काँग्रेसचे नेते व माजी पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. एकहाती सत्तेसाठी दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. परंतु, राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. शिवसेनेतून फुटून स्वतंत्र गट तयार केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने त्यांना पाठिंबा दिला आहे. सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांत एकत्रित लढणे अशक्य आहे.
महापालिकेवर 2010 पासून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. स्वतंत्रपणे लढून नंतर दोन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली होती. 2015 च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने मैत्रीपूर्ण लढती लढल्या होत्या. 81 नगरसेवकांच्या सभागृहात काँग्रेस 30 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला. बहुमताचा आकडा न गाठल्याने 14 जागांवर विजय मिळविलेल्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. ताराराणी आघाडीने 19 जागा, तर भाजपने 14 जागा मिळविल्या होत्या.





