पुणे-बंगळूर (pune bangalore) राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ महामार्गावर नादुरुस्त होवून थांबलेल्या कंटेनरला पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारची धडक बसली तर याच कारला पाठीमागून ट्रकने धडक दिली. या अपघातात कारमधील तिघेजण ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. अपघातातील मयत हे कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील आहेत.
या बाबत पोलिसांकडूनकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर (pune bangalore) राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ रात्रीच्या सुमारास महामार्गावर गाडीचा अॅक्सल तुटल्याने महामार्गावरच आयशर कंटेनर लावण्यात आला होता. कंटेनर लावताना कोणतीही दक्षता घेतली नव्हती. दरम्यान रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमास कर्नाटक राज्यातून बेंगळूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार पाठीमागून कंटेनर मध्ये घुसली. दरम्यान काही क्षणातच पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेत कारमधील त्रिलोकेश कुमार (वय४२), संजना माहेश्वरी (वय२७), जिथ्या त्रिलेश (वय२१, सर्व रा. साईकापल्ली मीनाक्षीनगर, कामाक्षीपल्ल्या, बेंगलोर राज्य-कर्नाटक) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अरिनी एन.(वय४१, बसवेश्वर नगर बेंगलोर) या गंभीर जखमी झाल्या.अपघातस्थळी पोलीस होमगार्ड धोंडीराम वड्ड (रा.किणी,ता.हातकणंगले) यांनी धाव घेऊन गाडीतील मयत व जखमींना गाडीबाहेर काढले.
अपघातस्थळावरील वाहने वडगाव पोलिसांच्या मदतीने बाजूला करण्यात आली.आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. बंगळूर येथील त्रिलेश कुमार सी. यांनी दीड महिन्यांपूर्वी नवीन एक्सयुव्ही (क्र.केए ०२ एम एस ६६१२) गाडी घेतली होती, या गाडीतून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना किणी येथील महामार्गाकडेला नादुरुस्त होऊन वळणाच्या उताराला थांबलेल्या कंटेनर (क्र.एमएच ११ सिएच २७७९) ला पाठीमागून धडक दिली. ही धडक किरकोळ होती. त्या ठिकाणाहून गाडी मागे घेत असतानाच पाठीमागून तरकारी भरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (क्र.के ए २७ बी ४५४४) ने या एक्सयूव्हीला जोराची धडक दिली. कंटेनर आणि ट्रकच्यामध्ये या गाडीचा चक्काचूर झाला.
अपघाताची नोंद वडगाव पोलिसांत झाली असून अपघातानंतर ट्रक व कंटेनरवरील चालक हे जखमींना मदत न करता तेथून पळून गेले आहेत. यावर फिर्यादी धोंडीराम वड्ड यांनी फिर्याद दिल्याने ट्रक चालकावर व महामार्गावर निष्काळजीपणे कंटेनर लावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करत आहेत.





