Thursday, November 13, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सैरभैर शेख कुटुंबाने अनुभवला जीवघेणा थरार!

कोल्हापूर : सैरभैर शेख कुटुंबाने अनुभवला जीवघेणा थरार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रविवारची मध्यरात्र… रेंदाळमधील अंबाईनगरात काळोख… जणू स्मशान शांतता… गल्लीतल्या मध्यावर शौकत शेख यांचं टुमदार घर… दरवाजावर दोन-चारवेळा धडाधड असा आवाज झाला… अंगाचा जणू थरकाप उडाला. मध्यान रात्री अवेळी कोण? चोर, दरोडेखोर तर नव्हेत… फटीतून हळूच डोकावले… दहा ते बारा जण प्रवेशद्वारात उभे ठाकलेले… दरवाजा उघडताच त्याच क्षणी सारेच घरात घुसले. ‘इर्शाद… इर्शाद.. कहा हैं? बेडरूममध्ये झोपला आहे, हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच इर्शादच्या खोलीत गराडा पडला. कुटुंबीयांना नजर कैदेत ठेवून इर्शादवर प्रश्नांचा भडीमार सुरू राहिला.



दहशतवादी संघटनांशी इर्शादचा थेट संबंध असल्याच्या संशयावरून मुंबई व दिल्लीतील विशेष पथकाने घरावर छापा टाकल्याची प्राथमिक माहिती कानावर पडली. या घटनेमुळे कुटुंबप्रमुख शौकत (वय 65), मुलगा इर्शाद, अल्ताफ, सून जोया यांच्यावर आकाश कोसळले. प्रवेशद्वारासह सर्वच खोल्यांमध्ये पहारा ठेवून पथकाची झाडाझडती सुरू झाली. स्वयंपाक खोलीतील भांड्यांसह फ्रिज, तिजोरी, कपाट, बॅगांमधील साहित्याची तपासणी केली. खोलीत पडलेल्या कागदी चिटकोऱ्याही ताब्यात घेण्यात आल्या.

मध्यरात्री साडेतीनला सुरू झालेली चौकशी सकाळी साडेआठपर्यंत बंद खोलीत सुरूच होती. याकाळात कुटुंबीयांतील कोणालाही जागचे हलू दिले नव्हते. संभाषण करण्यासही मनाई करण्यात आली होती. रोज पहाटेला उठणारे शौकतभाई अजूनही घरातून बाहेर आले नाहीत. दरवाजाही बंद… शेजाऱ्यांना शंका आली. शेजाऱ्यांनी घराकडे डोकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वारावर थांबलेल्या रक्षकांनी त्यांना मनाई केली. शौकतभाईंच्या घरात नेमके काय घडले असेल, याची कुजबूज सुरू झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -