येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सांगली जिल्ह्यातील एका गुंडाने गळफास घेवून आत्महत्या केली. भरत बाळासाहेब घसघशे (वय २९ , रा . वाडकर गल्ली , आष्टा जि . सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोकातंर्गत) अटक करण्यात आली होती. आत्महत्येची ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने कळंबा कारागृह प्रशासन हादरले गेले.
गुंड भरत घसघशे यांच्या विरोधी सांगली जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गर्दी , मारामारी , बेकायदा शस्त्रे बाळगणे अशा स्वरुपाचे गुन्हे नोद आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारनाम्याची सांगली पोलीस दलाने गांभीर्याने दखल घेतली. सन २०१९ मध्ये गुंड घसघशेसह त्यांच्या सहा साथीदाराविरोधी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली होती. तो आणि त्याचे साथिदारांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती.
गुंड घसघशेसह त्यांचे साथीदार सन २०१९ पासून कळंबा कारागृहाची हवा खात होता. गुरूवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने कारागृहातील सर्कल क्र. सातच्या शौचालयाशेजारी असलेल्या भिंतीजवळ कापडी पट्टीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कारागृहातील अन्य कैद्यांच्या निदर्शनास आला. यांची माहिती समजताच कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव, यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळाची धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून गुंड घसघशेचा मृतदेह उत्तरणीय तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. या घडल्या प्रकारामळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.