Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात प्रमुख भागात भटक्या कुत्र्यांचा धसका!

कोल्हापुरात प्रमुख भागात भटक्या कुत्र्यांचा धसका!

कोल्हापूर शहरात गेल्या आठवडाभरापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत चालली आहे.मात्र, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद अधिक गंभीर होत चालल्याने स्थानिकांसह पर्यटकांनी धास्ती घेतली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक नेहमीच पर्यटकांनी गजबलेला असतो. मात्र, त्याच बिंदू चौकात या आठवडाभरात तीन पर्यटकांचा भटक्या कुत्र्यांनी लचका तोडला आहे. त्यामुळे पर्यटक चांगलेच घाबरून गेले आहेत. सोमवारी दुपारी एका पर्यटकाचा लचका तोडल्याने स्थानिकांसह पर्यटकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून सहली तसेच पर्यटकांनी फुलून गेले आहे. त्यामुळे आणखी कोणी भटक्या कुत्र्यांच्या तोंडी लागू नये म्हणून कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रार करूनही अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी पाचगावमधील एका लहान मुलाच्या नाकावर कुत्र्याने चावा घेतला होता.

प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य

कोल्हापूर शहराच्या प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य आहे. वाहन वेगाने गेल्यानंतर कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. बिंदू चौक, मटण मार्केट परिसरात कुत्र्यांच्या चांगल्याच टोळ्या आहेत. रात्री दहा ते पहाटेपर्यंत त्यांचा ठिय्या असतो. ठिय्या मारुन कुत्री बसल्याने काही वेळेला चार चाकी वाहनधारकांना रस्त्यावरच थांबावे लागते. तसेच कचरा कोंडाळ्यासह मटण, चिकनची दुकाने, चायनीज दुकाने, कत्तलखाने परिसरात कुत्र्यांच्या झुंडींची दहशत आहे. चायनीजच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. चायनीजमधील कामगार जवळील कचरा कोंडाळी किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. शिल्लक अन्न, मांस, हाडे रस्त्याच्या कडेलाच टाकली जात असल्याने कुत्र्यांना हे खाद्य मिळते.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत असतानाच पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणेत भटक्या कुत्र्यांनी आत्तापर्यंत चौघांचा चावा घेतला आहे. यामध्ये एका मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याने योग्य ती कारवाई तत्काळ करावी, असे निवेदन अमित चोपडे नामक तरुणाने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून जिल्हा परिषदेने कारवाई करावी, अशी मागणी तरूणाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -