राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांना दोन आठवडे अटक करू नये, असे आदेशच कोर्टाने दिला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावरील अटकेची टांगती तलवार दोन आठवड्यापुरती दूर झाली आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती.
दोन दिवसांपूर्वी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर धाड मारली होती. ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी ही झाडाझडती केली होती. त्यामुळे मुश्रीफ समर्थक संतापले होते. मुश्रीफ समर्थकांनी या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार आंदोलनही केलं. मात्र, या कारवाईनंतर मुश्रीफ संपर्काबाहेर होते. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत थेट ईडीवरच आरोप करण्यात आले होते.ईडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सच पालन करत नसल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला होता. ईडीच्या हालचालीवरून हसन मुश्रीफ यांना अटक करण्याची त्यांना घाई आहे असं स्पष्ट होतंय, असं याचिकेत म्हटलं होतं. राजकीय विरोधक किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ यांना टार्गेट करत असल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला होता. कुठल्याही परिस्थिती हसन मुश्रीफ यांना अटक करण्याचा ईडीचा उद्देश असल्याचंही याचिकेत नमूद करम्यात आलं होतं. ईडीने मागच्या काही दिवसात तीन वेळा मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकलाय, याकडेही याचिकेतून कोर्टाचं लक्ष वेधण्यात आलं होतं.
10 मार्चला सकाळी साडेचार वाजता ईडीचे अधिकारी 8 इनोव्हा गाड्यांमधून आले. सीआयएसएफ जवान आणि इतर लवाजमा त्याच्यासोबत होता. त्यादिवशी मुश्रीफ यांना अटक करण्याचाच ईडीचा उद्देश होता. 10 मार्चला मुश्रीफ यांना मुरगुडच्या एका गुन्ह्यात हायकोर्टाकडून संरक्षण मिळालेलं आहे. हसन मुश्रीफ यांच राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा यातून उद्देश स्पष्ट होतोय असंही याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. मागच्या 25 वर्षात कागलच्या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनाच लोकांनी पसंद केलंय. म्हणूनच त्यांना राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी हा राजकीय अजेंडा राबवला जात असल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला होता.
तसेच या प्रकरणात कोर्टानेच तातडीने लक्ष घालण्याची विनंती करतानाच मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. कोर्टाने मुश्रीफ यांची बाजू ऐकून त्यांना मोठा दिलासा दिला आहे. दोन आठवडे मुश्रीफ यांना अटक करू नये, असे आदेशच कोर्टाने ईडीला दिले आहेत.