Sunday, December 22, 2024
Homeसांगलीपंचगंगेचे पाणी बोगद्यानेे राजापूरला सोडणार - जयंत पाटील

पंचगंगेचे पाणी बोगद्यानेे राजापूरला सोडणार – जयंत पाटील


कोल्हापूर शहरात घुसणारे पंचगंगेचे पुराचे पाणी कमी होण्यासाठी ते बोगद्याद्वारे राजापूर बंधार्याच्या खाली सोडणार आहे. तसेच सांगली शहराचे नुकसान कमी करण्यासाठी नदीकाठी पूरसंरक्षक भिंत बांधणार आहे, अशी घोषणा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केली.


पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनतर्फे सांगलीत शनिवारी पूर परिषद झाली. या वेळी त्यांनी वरील घोषणा केली. ते पुढे म्हणाले, प्रत्येक वेळेला पडणारा पाऊस व येणारा पूर हा वेगळा आहे आणि यापुढेही असणार आहे. 2005 मध्ये अंदाज न आल्याने सर्व प्रकारची हानी झाली. 2019 मध्ये प्रचंड पाऊस व विसर्ग यामुळे पुराने सर्वोच्च पातळी गाठली.


यावर्षी धरण परिसरात तसेच त्यापुढील भागात प्रचंड पाऊस झाला. यामुळे पाणी वाढण्याची गती जास्त होती. परंतु पूर्वीच्या दोन्ही पुराच्या अनुभवामुळे 2021 मध्ये जीवितहानी फारशी झाली नाही. कर्नाटकने सहकार्य केल्याने अलमट्टीचा विसर्ग वाढविला. तसेच अत्याधुनिक यंत्रणेमुळे पाणी कुठेपर्यंत वाढेल याचा अंदाज होता. त्यामुळे यंदा हानी कमी झाली.


ते म्हणाले, हवामान बदल, प्रदूषण, अतिक्रमणे, वाळू उपसा, प्लास्टिकचा अमर्याद वापर यामुळे परिस्थिती बिघडली आहे. निसर्गावरील अत्याचार मानवाने कमी केले नाहीत तर पुढील काही वर्षांत दूरगामी गंभीर परिणाम होऊन परिस्थिती आणखी बिघडणार आहे. पुनर्वसन हा काही पर्याय नाही. लोकसंख्या वाढीमुळे तो शक्य नाही. त्यामुळे पुराचे नियंत्रण हाच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. त्यामुळे शासनस्तरावर काही पर्यायांबाबत गंभीरपणे विचार सुरू आहे.
सांगली शहरात पुराचे पाणी घुसल्याने बाजारपेठेसह घरांची मोठी हानी होतेे. ती टाळण्यासाठी आता नदीकाठी ठिकठिकाणी पूरसंरक्षक भिंत बांधण्याचा विचार सुरू आहे. कृष्णा खोर्यातील पाणी भीमा खोर्यात देण्याबाबत कायदेशीर अडचणी आहेत. परंतु त्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे.


मंत्री पाटील यांनी पुढे सांगितले की, कोल्हापूर शहराला पंचगंगेच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे. कोल्हापूर शहर हे डोंगर रांगांच्या जवळ वसले आहे. त्यामुळे तेथे पडणारे पाणी थेट नदीत आणि शहरात येते. तसेच धरणेही छोटी छोटी असल्याने लवकर भरतात. परिणामी पाणी सोडावे लागते. त्यातच महामार्ग उंच बांधल्याने कोल्हापुरात पाणी लगेच वाढते.


कोल्हापुरातील हानी थांबविण्यासाठी पंचगंगा नदीचे(panchganga river) पाणी बोगदा अथवा कालव्याद्वारे राजापूर बंधार्याच्या खाली सोडण्याचे नियोजन केले आहे. या दोन्ही योजना प्रत्यक्षात आल्यानंतर पाणी पातळी काहीशी नियंत्रणात ठेवता येऊन सांगली, कोल्हापूरला बसणारा महापुराचा फटका कमी होणार आहे.
सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, मानवनिर्मित कारणांमुळे महापूर येऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. अतिक्रमण, वाळू उपसा यावर बंधने हवीत. तसेच पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


या वेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. विक्रमसिंह सावंत, जलतज्ज्ञ राजेंद्र पवार, प्रमोद चौगुले, मयुरेश प्रभुणे यांची भाषणे झाली. संयोजक काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. तसेच परिषदेत झालेल्या ठरावांचे वाचन केले. हे ठराव शासनाला पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमास महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक अभिजित भोसले, अजय देशमुख, राजेंद्र मेथे, जे. के. बापू जाधव, संजय बजाज, नीता केळकर, पद्माकर जगदाळे, दिगंबर जाधव, मंगेश चव्हाण यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -