रस्त्यात अडवून गाडी काढून घेण्यासह एकाचे अपहरण करत ६५ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. आदम महमंद मुजावर (वय १९ रा. नेहरुनगर) आणि पंकज उर्फ महेश व सुभाष भोपळे (वय २१ रा. र नारायण चित्रमंदिरजवळ) अशी त्यांची नावे असून या प्रकरणी दर्शन दत्तात्रय राणे (वय १८ रा सनसिटी अपार्टमेंट यड्राव) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी दर्शन राणे हा सुमित मठपती आणि सतेज ढोकरे या मित्रांसमवेत बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कत्तलखाना मार्गे फॉर्च्यून प्लाझाच्या दिशेने जात असताना आदम मुजावर आणि पंकज भोपळे यांनी त्यांच्या दोन्ही गाड्यांच्या आडवे दुचाकी घालून अडविले.
मी यापूर्वी मर्डर केला असून माझ्याबद्दल लोकांना विचारा असे म्हणत तिघांना भिती दाखवत दर्शन याच्या खिशातील ६० रुपये आणि सुमित याच्या खिशातील ५० रुपये काढून घेतले. तर आदम मुजावर याने सतेज ढोकरे याची एमएच ०९ एफझेड ८६२८ ही दुचाकी काढून घेत त्यावर जबरदस्तीने सतेज याला बसविले आणि सतेजला सोडण्यासाठी ६५ हजार रुपये आणून द्या. मागे आलात तर तुम्हा सर्वांना संपवून टाकेन अशी धमकी देत सतेजला घेऊन गेले.
यानंतर दर्शन राणे याने गावभाग पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तपास करत थोरात चौक येथील मार्केट शेडमध्ये संशयितांना ताब्यात घेऊन सतेज याची सुटका केली. दर्शन याच्या फिर्यादीवरुन दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.