वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी इचलकरंजी येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि राजीव पाटील यांनी शहर व परिसरात धडक मोहिम राबविली. यामध्ये वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळा-महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या ५७८ वाहनधारकांवर कारवाई करत ५ लाख ६६ हजार २०० रुपये इतका दंड वसुल करण्यात आला.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि राजीव पाटील यांनी नुकताच पदभार स्विकारला असून त्यांनी शहर व परिसरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, विनानंबर प्लेट, अवैध वाहतूक, वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे पार्किंग यासह शाळा- महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी करणे आदी ५७८ वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून ५ लाख ६६ हजार २०० रुपये इतका दंड वसुल करण्यात आला.
दरम्यान, वाहनावर असलेला पेंडींग दंड संबंधित वाहनधारकांनी ३१ जुलै रोजी आयोजित लोक अदालतपूर्वी किंवा वाहतूक शाखेत अथवा नजीकच्या वाहतूक अंमलदाराकडे भरावा. जेणेकरुन न्यायालयात जाण्याचा कटू प्रसंग टाळता येईल, असे आवाहन सपोनि राजीव पाटील यांनी केले आहे.