मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. आज तेराव्या दिवशीही त्यांचं उपोषण सुटलेलं नाही. मागण्या मान्य न झाल्याने जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहे. तर सकारने तीनदा प्रतिनिधी पाठवून जरांगे पाटील यांचं मन वळवण्याचे प्रयत्न केले. पण तिन्हीवेळीच्या चर्चेत काहीच पदरात न पडल्याने जरांगी पाटील प्रचंड निराश झाले आहेत. मुंबईत बैठक होऊनही काहीच आदेश निघाले नाहीत, त्यामुळेही मराठा समाजात अस्वस्थता आहे. आता तर जरांगे पाटील यांनी आजपासून औषधे आणि पाणीही त्यागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारची अधिकच कोंडी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधी पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांची एक महाबैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. तसेच ओबीसींच्या भूमिकेवरही चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत आहेत. आज रात्री उशिरापर्यंत ते मुंबईत येतील. त्यानंतर उद्या मुंबईत बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत विविध पक्षाच्या नेत्यांकडून काही महत्त्वाच्या सूचना येतील. त्यातून आरक्षणावरील तोडगाही मिळू शकतो, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार मीडियाशी संवाद साधत होते.
बैठकीतून निर्णय की फार्स?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली उद्याची बैठक ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतून काही ठोस निर्णयही होऊ शकतात. मात्र, या बैठकीतून काही निर्णय घेतले जातील की बैठक निव्वळ फार्स ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्या 11 जणांच्या शिष्टमंडळासोबत अडीच तास बैठक झाली. त्यात सात निर्णय घेण्यात आले. पण एकाही निर्णयाचे आदेश निघाले नाहीत.
समित्यांना अहवाल देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण अधिकाऱ्यांना बडतर्फ करायला आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायलाही समितीच लागते का? यावर तात्काळ आदेश काढता येत नाही का? असा सवाल आंदोलक करत आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीतही नुसतीच चर्चा होणार की बैठकीनंतर तातडीचे आदेशही निघणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आदेश काढा, नाही तर…
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं आजही जालन्यात उपोषणसुरू आहे. आजपासून आपण औषधं घेणं बंद करणार असून पाणीही त्यागणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत मी सरकारचं ऐकलं. शब्दाला जागलो. पण सरकार शब्दाला जागत नाही. आम्ही जी मागणी केली ती पूर्ण होत नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण आदेश काढत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे, अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, ही आणची मागणी आहे. त्यात तडजोड नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.