दिवाळी सुट्टी काळात प्रवाशांची परगांवी जाण्यासाठी अथवा येण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराने योग्य नियोजन केले होते. या दिवाळी हंगामाच्या ११ दिवसात तब्बल १ कोटी ७५ लाख ६५ हजार ९६८ इतके विक्रमी उत्पन्न मिळविले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या होत्या. इचलकरंजी आगाराकडील ८२ आणि इतर १० अशा ९२ एस. टी. द्वारे एकूण ३ लाख ९९ हजार २५५ किलोमीटरचा टप्पा पार करण्यात आला. यातून निव्वळ रोख स्वरुपात १ कोटी ७५ लाख ६५ हजार ९६८ इतकी रक्कम मिळाली. तर महिला सन्मान या सवलतीची रक्कम अधिक केल्यास ही रक्कम २ कोटी २८ लाख ९९ हजार २१८ इतकी होते.
उपरोक्त कालावधीत एकूण ४ लाख २ हजार ५५९ प्रवाशांनी इचलकरंजी बसस्थानकातून प्रवास केला. त्यामध्ये २ लाख ९ हजार ४२६ इतक्या विक्रमी संख्येने महिलांनी एस. टी. प्रवासाचा लाभ घेतला.
बसस्थानकात विविध सोयी- सुविधा, स्वच्छता कायम ठेवत प्रवाशांचा अधिक सुलभ प्रवास कसा होईल याकडे लक्ष दिले असून नवीन २० एस. टी. चा प्रस्ताव महामंडळाकडे दिला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून सुमारे ५.५० कोट रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव तयार केला असून त्यालाही लवकर अंतिम स्वरुप मिळेल, असेही पाटील यांनी सांगितले. प्रतिकिलोमीटर इतके उत्पन्न मिळाले असून ६४ इतके भारमान राहिले आहे.
तर २० नोव्हेंबर ला ३८ हजार ९१३ इतकी सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली असून यादिवशी २० लाख २ हजार इतके रोख उत्पन्न मिळविले आहे. यामध्ये इचलकरंजी आगारातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचारी व अधिकारी यांनी अविरत व प्रामाणिकपणे मेहनत घेतली असून त्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. यासाठी विभाग नियंत्रक व विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, असेही आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितले. यावेळी सहायक कार्यशाळा अधिक्षक सुहास चव्हाण, परेश पै, आनंदा दोपारे, प्रल्हाद घुणके आदी उपस्थित होते.