टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज ऑलराउंडरचं निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. या दिग्गजाने खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये एकदाही टीमचा पराभव झाला नाही. तसेच क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या दिग्गजाने कोच आणि मॅच रेफरी अशा भूमिकाही सार्थपणे पार पाडल्या. या दिग्गजाने वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज ऑलराउंडर माईक प्रॉक्टर यांचं निधन झालं आहे. माईक प्रॉक्टर यांचा हृदय विकाराचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. शनिवारी रात्री त्यांच्या पत्नीने याबाबतची माहिती दिली. तसेच आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच माईक प्रॉक्टर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माईक प्रॉक्टर यांचं क्रिकेट करिअर
माईक प्रॉक्टर यांची क्रिकेट कारकीर्द फार मोठी नव्हती. त्यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत 7 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. मात्र ते दक्षिण आफ्रिकेसाठी लकी ठरले. माईक प्रॉक्टर यांनी खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये एकदाही दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला नाही. प्रॉक्टर 7 सामने खेळले. प्रॉक्टर यांनी खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. तर 1 सामना हा ड्रॉ राहिला.
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 1969-70 साली ऑस्ट्रेलियावर 4-0 अशा फरकाने विजय मिळवला होता. माईक प्रॉक्टर यांनी या मालिकेत निर्णायक भूमिका बजावली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे 1970 साली सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत त्यांचं नाव जोडलं गेलं. तसेच क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर माईक प्रॉक्टर यांनी 2002 ते 2008 या कालवधी दरम्यान मॅच रेफरी म्हणून काम केलं. सामन्यात क्रिकेटच्या नियमांचं पालन होतंय की नाही, हे पाहणं मॅच रेफरी अर्थात सामनाधिकाऱ्याची जबाबदारी असते.