चार चाकीच्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. अश्विनी पंकज निकम (वय३७ रा. विक्रोळी मुंबई) व रुपाली सचिन कांबळे (४० रा. आष्टा मिसळवाडी) असे मृत महिलांची नावे आहेत.तर, देवांशी पंकज निकम (७) व अक्षय गजानन उल्लाळकर (३० रा. मुंबई) हे दोघे जखमी झाले. हा अपघात आष्टा-औदुंबर रस्त्यावर आज, शनिवारी सकाळच्या सुमारास घडला.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील गजानन उल्लाळकर पती पत्नी औदुंबर दत्त दर्शनासाठी शुक्रवारी आले होते. त्यांची मुलगी अश्विनी व नात देवांशी दत्त दर्शनासाठी येणार होते. त्यामुळे बंधू अक्षय उल्लाळकर हे मुंबईहून अश्विनी व देवांशी यांना घेऊन पुणे येथे शुक्रवारी रात्री आले.
तेथून मित्राची चार चाकी क्रमांक (एम एच १२ डब्ल्यू ई ६७७५) घेऊन पहाटे दत्त दर्शनासाठी निघाले. पुणेहुन आष्टा ते औदुंबर जात असताना एका लॉजच्या नजीक समोरून रूपाली कांबळे अचानक गाडीच्या समोर आल्या. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षय उल्लाळकर यांनी ब्रेक दाबला. मात्र रूपाली कांबळे यांना धडकून गाडी पुढे उसाच्या शेतात गेली.
गाडीच्या धडकेत रूपाली कांबळे ठार झाल्या. तर गाडीमधील अक्षय यांची बहीण अश्विनी निकम यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याही जागीच ठार झाल्या. भाची देवांशी निकम व अक्षय उल्लाळकर हे जखमी झाले. जखमींना आष्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी अश्विनी निकम यांच्या आई वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. दत्त दर्शनासाठी येणाऱ्या लेकीवर काळाने घाला घातल्यानेआई-वडिलांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.
घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, सतीश शिंदे, जयदीप कळेकर यांच्यासह पोलीस दाखल झाले. अश्विनी निकम व रूपाली कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.