कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने(rain) जोर धरला आहे. जिल्ह्यातील पाण्याखालील बंधाऱ्याच्या संख्येत वाढ झाल्याने कोल्हापूरच्या ग्रामीण भागासह नदीकाठच्या भागात पूरस्थिती जैसे थे आहे. पुढील चार दिवस पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केल्याने पूर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेली तीन दिवस जिल्ह्यात पावसाचे(rain) प्रमाण कमी झाले होते, मात्र काल रात्रीनंतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणे आणि नद्यातील पाणीपातळी वाढली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी काल ४४ फूट ४ इंच होती, ती आज ४३ फूट या धोका पातळीवरून वाहत आहे. पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या आज ७९ इतकी झाली आहे.
वाहतुकीवर परिणाम
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर अजूनही सुमारे दीड ते दोन फूट पाणी आहे. चिखली – आंबेवाडी या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून, धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. निढोरी, मुरगुड- निपाणी हा आंतरराज्य मार्ग आज तिसऱ्यांदा बंद झाला आहे. वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. पुराच्या पाण्यातून वाहतूक होत असल्याने येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९ राज्य व ४४ प्रमुख जिल्हा असे ५३ मार्ग बंद झाले आहेत.
सतर्कतेचा इशारा
राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे तासाभरात उघडले असून, विसर्ग वाढल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती सुधारण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.