कोरोना काळात प्रत्येकाला निरोगी जीवनाचे महत्त्व समजते आहे. निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली अमुल्य देणगी म्हणजेच रानभाज्या होय. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये नैसर्गिक रानभाज्यांचा वापर करणे महत्त्वपूर्ण आहे.
आयुभूषण आयुर्वेद संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट व व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्रद्यमाने दिनांक १७ व १८ऑगस्ट २०२४ रोजी व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी येथे रानभाज्या व आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. इचलकरंजी परिसराच्या इतिहासात प्रथमच शंभरहून अधिक रानभाज्या व आयुर्वेदिक औषधींचे प्रदर्शन भरवले जात आहे. १७ ऑगस्ट शनिवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून १२ वाजता ते नागरिकांसाठी खुले होईल.रविवारी सकाळी.१० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहील.
पावसाळ्यात शेतामध्ये जंगलात डोंगर रानावर तसेच आदिवासी भागात या रानभाज्या उगवत असतात. अशा आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या रसायन विरहित विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावे म्हणून व्यंकटराव हायस्कूलच्या परिसरात सदरच्या रानभाज्या महोत्सवाच्या आयोजन करण्यात येत आहे.
रासायनिक खते आणि विषारी औषध आणि युक्त भाज्यांच्या भडीमाऱ्यामुळे जगभरातील सर्वच लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण आदिवासी भागात नैसर्गिक रित्या येणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व लक्षात घेणे अत्यावश्यक बनले आहे. या रानभाज्या आरोग्यासाठी पोषक असून या महोत्सवात कोकण व आदिवासी भागातील भगिनींनी रानातून गोळा केलेल्या जीवनसत्व लोह कॅल्शियम हे भरपूर युक्त भाज्या फळे व त्यापासून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. अनेक पौष्टिक भाज्या त्यांचे बनवण्याची पद्धत आणि उपलब्धतेचे ठिकाण अशी सर्व माहिती या महोत्सवात देण्यात येणार आहे.
आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या आणि सध्या लुप्त पावत चाललेल्या रानभाज्या सुद्धा या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.
भुईआवळा, लाल माठ, पांढरा माठ, घोळ, चुका, शेवगा, कांचन, राजगिरा, उंबर, कपाळफोडडी, करटोली सुरण, पाथरी, चिचुर्टी, काटेकोळशिंदा, मोहर, भारंगी, शतावरी, गरबी कोळपी, कुयरु अशा १०० पेक्षा अधिक रानभाज्या व औषधी वनस्पती प्रदर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या अनोख्या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भूषण काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.