या परिसरात मोजकेच आदिवासी पाडे असल्याने पनवेल व उरण भागातूनदेखील ताज्या व रासायनिक खत विरहित अशा गावरान भाज्या बाजारात दाखल होत आहेत. यंदा गावरान भाज्यांचे भावही कडाडले आहेत, त्यांचे भाव किलो मागे साठ ते दोनशे रुपयांवर पोहचले आहेत.
श्रावण महिन्यात पावसाच्या सुरुवातीला शहरातही आदिवासी बांधव आपल्या घराच्या परसात स्थानिक भाज्यांची मशागत करतात. या ठिकाणी शिरले, काकडी, घोसाळी, दुधी भोपळे, पडवळ आदींचे पीक घेतले जाते. या भाज्या बहुतांशी सेंद्रिय व पारंपरिक पद्धतीनेच घेतल्या जातात.
भाज्यांचे भाव
शिराळे : १०० ते २०० रुपये किलो
कारली : १०० ते १५० रुपये किलो
काकडी : ५० ते ७० रुपये किलो
घोसाळी : ८० ते १५० रुपये किलो
आळु : ५० रुपये जुडी
भाजे : ७० रुपये जुडी
केवला : २० ते ४० रूपये जुडी
मिरची : ८० ते १४० रु किलो
पावसाळी भाज्यांना चांगली मागणी
रसायनी पाताळगंगा परिसराचे मुख्यालय वासांबे, मोहोपाडा बाजारपेठेत परिसरातील पावसाळी मळ्यातील भाज्या दाखल झाल्या आहेत. या भाज्या ताज्या व स्वस्त भावाने मिळत असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी वाढली आहे. भाज्यांना भावही चांगला मिळत असल्याने भाजीविक्रेतेही समाधान व्यक्त करत आहेत.
माणिक गड आणि कर्नाळा किल्ल्याच्या डोंगर भागातील आदिवासी बांधव, शेतकरी पावसाळी डोंगर उतारावर भाज्यांची लागवड करतात. याला पावसाळी किंवा श्रावणी भाज्यांचे मळे म्हणतात. या भाज्या दीड-दोन महिन्यांनी तयारही होत असतात. त्यानंतर या भाज्या पनवेल किंवा रसायनी पाताळगंगा परिसराचे मुख्यालय वासांबे, मोहोपाडा येथील बाजारपेठेत विक्रीसाठी येतात.