MPSC च्या विद्यार्थ्यांच मागच्या तीन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरु होतं. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. तीन दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत होते. मंगळवार रात्रीपासून हे विद्यार्थी पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री रोडवर आंदोलन करत होते. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची होती. अखेर मुख्यमंत्री कार्यालयाने 25 ऑगस्ट 2024 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षेची पुढची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
माध्यमांनी या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर हळूहळू राजकीय नेते आंदोलस्थळी येऊ लागले होते. आज शरद पवार MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार अशी चर्चा होती. आमदार रोहित पवारदेखील या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले होते. प्रशासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे शांततेचं आवाहन पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना करण्यात आलं होंत.
दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला होता. यासंदर्भात सरकार दरबारी वारंवार मागणी करूनदेखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही, त्यामुळे अखेर या परीक्षार्थीनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केलं होतं.