महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी व कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांसाठी सिंचनाची महत्त्वाची गरज भागवणारे कोयना धरण बुधवारी सकाळी काठोकाठ भरले. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
आगामी सिंचन व वीज निर्मितीची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे. कोयना ते महाबळेश्वर अशा तब्बल साडेसदुसष्ठ किलोमीटरचा शिवसागर जलाशय पूर्णतः जलमय झाला आहे. धरणाची साठवण क्षमता संपली असतानाच धरणांतर्गत विभागात पडत असलेल्या पावसामुळे धरणात अतिरिक्त पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणाचे सहा वक्र दरवाजे संध्याकाळी सात वाजता तीन फुटांनी उचलून त्यातून 28,396 तर पायथा वीजगृहातून 2100 असे प्रतिसेकंद 30,496 क्युसेक पाणी पूर्वेकडे सोडण्यात आले आहे.या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत धोकादायक वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. एक जून या कोयना धरणाच्या नव्या तांत्रिक जलवर्षात अवघ्या 18 टीएमसी पाण्यावर धरणाचा तांत्रिक जलप्रवास सुरू झाला. आतापर्यंत यावर्षी पडलेल्या पावसात धरणात तब्बल 143.33 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
यापैकी आतापर्यंत पश्चिम वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी 10.86 टीएमसी पाण्यावर 504.566 दशलक्ष युनिट तर धरण पायथा वीजगृहातून सिंचनासाठी 1.16 तर पूरकाळातील 3.95 अशा 5.11 टीएमसी पाण्यावर 22.352 अशा एकूण 15.97 टीएमसी पाण्यावर 526.918 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी याचदिवशी धरणात 85.66 टीएमसी उपलब्ध पाणीसाठा होता, तर यावर्षी तोच साठा 105.25 टीएमसी म्हणजेच शंभर टक्के इतका आहे. गतवर्षी वर्षभरात भलेही 113 टीएमसी पाण्याची आवक झाली मात्र तरीही एकाचवेळी धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. चालू वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, याशिवाय आत्तापर्यंत पूर्वेकडे धरणाच्या सहा वक्री दरवाज्यातून तब्बल 38.53 टीएमसी इतकं महाकाय पाणी विनावापर सोडून देण्यात आले आहे. उर्वरित जलवर्षात यापुढे पश्चिम वीजनिर्मितीचा 56, सिंचनासाठी सरासरी 35 व मृतसाठा 5 अशा एकूण 96 टीएमसी पाण्याची गरज आहे. त्याचवेळी धरणात त्याहीपेक्षा ज्यादा पाणीसाठा शिल्लक आहे व अद्यापही पाऊसमान बाकी असल्याने धरणातील पाण्याबाबत आता कोणत्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही.
धरणाचे सहा वक्र दरवाजे संध्याकाळी सहा वाजता दोन फुटांनी उचलून त्यातून 19,096 तर पायथा वीजगृहातून 2100 असे प्रतिसेकंद 21,196 क्युसेक पाणी पूर्वेकडे सोडण्यात आले आहे. एक जून पासून आतापर्यंत कोयना 5089, नवजा 6014 व महाबळेश्वर 5796 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान 105.25 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर साठवण क्षमता संपुष्टात आल्याने बुधवारी संध्याकाळी सात वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांनी उचलून त्यातून 28,396 तर पायथा वीजगृहातून 2100 असे प्रतिसेकंद 30,496 क्युसेक पाणी पूर्वेकडे सोडण्यात आले आहे.पूर्वेकडे कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्याचवेळी धरणात प्रतिसेकंद सरासरी 15,499 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे यापुढे धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्याच पटीत पूर्वेकडे पाणी सोडावे लागणार आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
लवादाचा बागुलबुवा नको
1 जून ते 31 मे या तांत्रिक जलवर्षात पश्चिम वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणीवापर लवादाचे आरक्षण लक्षात घेता त्यावर मर्यादा आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यापुढे अतिरिक्त पाणी विनावापर पूर्वेकडे सोडावे लागत आहे. हेच पाणी पूरकाळात पश्चिम जलविद्युत निर्मितीसाठी वापरून यातून अधिकाधिक वीजनिर्मिती करता येणे शक्य आहे. दरम्यानच्या काळात राज्याला कोळसा, गॅस, थर्मलच्या महागड्या विजेला हा सर्वोत्तम पर्याय असल्याने या पाण्यावर शेकडो दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होईल. परंतु पूर काळातील हा अतिरिक्त पाणीवापर लवादाच्या वर्षभरातील आरक्षित कोट्यातून वगळणे महत्त्वाचे आहे. हा सकारात्मक विचार शासन, प्रशासनाने करणे गरजेचे असतानाही केवळ लवादाचा बागुलबुवा करतच आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धन्यता मानली आहे.