नागपूरहून गोव्याला जाणारा आयशर टेम्पो रविवारी सकाळी आंबोली घाटातील नाना पाणी जवळच्या धोकादायक वळणावर दरीत कोसळला. ब्रेक निकामी झाल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि टेम्पो तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत जाऊन उलटला.
चालक किरकोळ जखमी झाला.
अधिक माहिती अशी की अपघाग्रस्त टेम्पो हा नागपूरहून गोव्यात जात होता. टेम्पोमध्ये पावडरचा माल भरला होता. सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. माळा कॉलनी, नागपूर) हा गाडी चालवत होता.
टेम्पो आंबोली घाटातील नाना पाणी जवळच्या धोकादायक वळणावर पोहाेचला असता गाडीचे ‘ब्रेक’ निकामी झाले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत जाऊन उलटला.
या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक सुमित हा किरकोळ जखमी झाला. प्रवीण राऊत, यश राऊत आणि इतर स्थानिकांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच कर्नाटक येथील पर्यटकांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.