Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलांनो २१०० रुपये सोडा, आता मिळणार लाखोंचे पॅकेज; भाजपच्या जाहीरनाम्यात ‘लाडक्या बहि‍णीं’साठी...

महिलांनो २१०० रुपये सोडा, आता मिळणार लाखोंचे पॅकेज; भाजपच्या जाहीरनाम्यात ‘लाडक्या बहि‍णीं’साठी खास घोषणा कोणत्या?

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अवघे 10 दिवस शिल्लक आहेत. त्यातच आता प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते नुकतंच भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या संकल्प पत्रात पुढील पाच वर्षे भाजपकडून विविध आश्वासने देण्यात आली आहेत. यात लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासोबतच तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. त्यासोबतच अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ केली जाणार आहे. भाजपच्या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही पुढील ५ वर्षात भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

 

भाजपने नुकतंच जाहीर केलेल्या संकल्पपत्रात महिलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. यात राज्यातील सर्व महिलांना सुरक्षेची, सन्मानाची आणि संधीची समानता सुनिश्चित केली जाईल, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या संकल्पपत्रात महिलांसाठी काही खास घोषणा करण्यात आल्या आहेत.

 

भाजपच्या संकल्पपत्रात महिलांसाठीच्या घोषणा

महिला आत्मनिर्भरता

 

लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील. तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. तसेच महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत. या योजनेत यापुढेही सातत्य ठेवण्यात येईल.

 

अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला १५,००० रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.

 

परिवर्तनकर्त्या महिला

 

सन २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लाख लखपती दीदी तयार करण्यात येतील. यासाठी, प्रत्येक ५०० स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि अशा सर्व क्लस्टर्ससाठी १,००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविण्यामध्ये UMED (महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान) चे महत्त्व लक्षात घेता UMED चे बळकटीकरण करण्यात येईल. महिला उद्योजक व महिला बचत गटासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ स्थापन करण्यात येतील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात वार्षिक ‘कर्मयोगिनी मेळावा’ आयोजित करण्यात येईल.

 

महिला सन्मान, सुरक्षा व सुविधा

 

महाराष्ट्रातील महिला स्वयं सहायता गटांना बळकट करण्यासाठी खालील उपाय केले जातील

 

महिला स्वयं सहायता गटाचे MSMEs मध्ये श्रेणीवर्धन करावयाचे झाल्यास त्यासाठी ₹१० लाखांचे कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे.

 

महिला उद्योजकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी MUDRA योजनेअंतर्गत व्याजमुक्त कर्ज सुलभ करणे.

 

महिला स्वयंसहाय्यता गट व बँक यांचे सुदृढ संबंध प्रस्थापित होवून कर्ज प्राप्त करुन घेणे सुलभ व्हावे, यासाठी महिला स्वयंसहाय्यता गटांचे डिजीटायजेशन करण्यात येईल.

 

प्रत्येक जिल्हा आणि नागरी सहकारी बँकांमध्ये महिला स्वयंसहाय्यता गटांसाठी समर्पित कक्ष स्थापन करण्यात येईल.

 

‘राजमाता जिजाऊ मातृ वंदना पुरस्कार’ सुरु करण्यात येईल. ज्यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येईल.

 

ग्रामीण भागातून शिक्षणासाठी व व्यवसायाच्या निमित्ताने जिल्हा मुख्यालयी येणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिला व्यवसायिकांसाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असलेल्या अहिल्याबाई होळकर महिला वसतिगृहे स्थापित करण्यात येतील.

 

मुंबई शहरात सुरू करण्यात आलेल्या व प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या तेजस्विनी बसेसच्या धर्तीवर महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये गर्दीच्या तासांत महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येईल.

 

सर्व शिक्षण संस्थांमध्ये मुली आणि महिलांना कोणत्याही प्रकारचा छळ आणि भेदभाव रोखण्यासाठी विशाखा समित्या स्थापन करण्यात येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -