टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने बुधवारी 22 जानेवारीला कोलकातमधील ईडन गार्डनमध्ये इंग्लंडवर 7 विकेट्स एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव नववर्षातील पहिल्या सामन्यात फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला. सूर्यकुमारला भोपळाही फोडता आला नाही. मात्र अभिषेक शर्मा आणि याने केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. अभिषेकने 34 बॉलमध्ये 5 फोर आणि 8 सिक्ससह 79 रन्स केल्या. अभिषेकच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 43 बॉलआधीच विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 133 धावांचं आव्हान भारताने 12.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन सूर्यकुमारने हेड कोच गौतम गंभीरबाबत काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
“गौती भाईने (गौतम गंभीर) आम्हाला फार स्वातंत्र्य दिलं आहे. आम्ही 2024 टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळलो, त्यापेक्षा थोडं वेगळं खेळू इच्छितो. आमच्याकडे प्लान आहे, आम्ही त्यानुसारच बॅटिंग करत आहोत, त्यानुसारच आमची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्ही सर्व फिल्डिंग कोचसह कसून सराव करत आहोत”, असं सूर्यकमारने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हटलं.
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला एक एक करुन ठराविक अंतराने झटके दिले. मात्र जॉस बटलर याने दुसऱ्या बाजूने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. जॉस बटलर याने 44 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्ससह 68 रन्स केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 132 धावा केल्या.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.