टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने गेल्या काही वर्षांपासून बॅटिंगचा गिअर बदलला आहे. सामना कोणताही असो रोहित हल्ली फटकेबाजीच करत सुटतो. रोहित आऊट होण्याची भीती न ठेवता प्रतिस्पर्धी संघांतील गोलंदाजांना झोडतो. रोहितने या निर्भीड आणि स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला अनेकदा सामने जिंकून दिले आहेत. मात्र रोहितची हीच निर्भीड वृत्ती त्याच्यासाठी डोकेदु:खी ठरतेय, असं त्याची आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल. टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. मात्र रोहितची आयसीसी स्पर्धेतील अंतिम फेरीतील धावसंख्या त्याच्या लौकीकाला साजेशी नाही.
आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यांत “रोहित शर्मा आऊट…”, हे असं आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना फार लवकर ऐकायला मिळालंय. रोहित आतापर्यंत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्यासाठी बेछूट खेळला आहे. निर्भिडपणे खेळायचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. रोहितच्या बॅटिंगची स्टाईल पाहता तो पहिल्या बॉलवर आऊट होईल की नॉट आऊट परतेल? यापैकी काहीही होऊ शकतं. बेछूट-निर्भिडपणे खेळायची वृत्ती आणि आयसीसी स्पर्धेतील अंतिम फेरीतील आकडेवारी पाहता रोहितवर पुन्हा एकदा लवकर आऊट होण्याची टांगती तलवार आहे, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.
6 सामने आणि 124 धावा
रोहित आतापर्यंत टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धेत एकूण 6 अंतिम सामने खेळला आहे. या 6 अंतिम सामन्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, वनडे आणि टी 20i वर्ल्ड कप स्पर्धांचा समावेश आहे. रोहितने आयसीसी स्पर्धेतील 6 अंतिम सामन्यांमध्ये 124 धावा केल्या आहेत. रोहितला या 6 डावांमध्ये अर्धशतकही करता आलेलं नाही. त्यामुळे आता रोहितने न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये मोठी खेळी करावी आणि इतिहास बदलावा, अशी प्रत्येक रोहित चाहत्याची अपेक्षा असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.