बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या वडणगे सासने मळा येथील घटना; सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. वडणगे येथील सासने मळा, शिव-शक्ती कॉलनी परिसरात राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने रविवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
राज दिपक कांबळे (वय २१, मूळ रा. कदमवाडी, ता. करवीर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज हा शहरातील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो शांत व एकलकोंडा झाला होता; मात्र त्याने घरातील कोणालाही आपल्या मनातील ताणतणावाबाबत माहिती दिली नव्हती. शनिवारी रात्री जेवण करून तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला होता.
रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजेपर्यंत त्याने दरवाजा न उघडल्याने त्याचा भाऊ प्रेम याने खोलीत जाऊन पाहिले असता, राजने नायलॉनच्या दोरीने छताच्या अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात येताच घरातील सदस्य व शेजारी तातडीने धावून आले. त्याला तात्काळ खाली उतरवून खासगी वाहनाने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





