1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशम’ सिनेमा महानायक अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री सौंदर्या होती. ‘सूर्यवंशम’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सौंदर्याच्या वयाच्या 31 व्या वर्षी निधन झालं आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण अभिनेत्रीच्या निधनाबद्दल आधीच भविष्य वाणी देखील करण्यात आली. दरम्यान, सौंदर्याच्या मृत्यूच्या 22 वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेते मोहन बाबू यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहन बाबू यांच्यावर सौंदर्याच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं, 12 वर्षांमध्ये सौंदर्या हिने 100 सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘सूर्यवंशम’ सिनेमातून मिळालेल्या यशानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री राजकारणाकडे स्वतःचा मोर्चा वळवला. अभिनेत्रीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाच्या रॅलीनिमित्त अभिनेत्री खासगी विमानाने करीमनगरला जात होती. तेव्हा विमान टेक ऑफ करताच ते कोसळलं आणि त्या अपघातात अभिनेत्रीने प्राण गमावले.
रिपोर्टनुसार, त्यावेळी अभिनेत्री करीमनगरला भाजप आणि तेलुगु देसम पार्टीच्या एका राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती, ज्यामध्ये तिच्या भावाचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सौंदर्याचा मृतदेहही सापडला नाही. आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या 22 वर्षांनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या विमान अपघातात सौंदर्याचा भाऊ आणि इतर दोन जणांना जीव गमवावा लागला. रिपोर्टनुसार, अपघाताच्या वेळी अभिनेत्री दोन महिन्यांची गरोदर होती. तिच्या मृत्यूच्या सुमारे एक वर्ष आधी, तिने 2003 मध्ये तिचा बालपणीचा मित्र आणि सॉफ्टवेअर अभियंता जीएस रघुशी लग्न केले.
असं सांगितलं जातं की, सौंदर्याच्या जन्माच्या वेळी एका ज्योतिषाने लहान वयातच तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. मात्र, सौंदर्याच्या आई-वडिलांनी तिचा मृत्यू टाळण्यासाठी अनेक पूजा आणि हवनांचे आयोजन केलं. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जे अभिनेत्रीच्या नशिबात लिहिलं होतं तेच झालं. करीयरच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला.