विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. नांदेडच्या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा (Nanded Crime News) दाखल केला, यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकाने लिहिली होती चिठ्ठी
पुढे आलेल्या माहितीनुसार, नांदेडमधल्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली आणि कुटुंबातील नातेवाइकांनी पोलीस स्टेशन गाठत मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने विष पित आपले आयुष्य संपवलंय. आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापकाने एक चिठ्ठीही लिहिली होती.
घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला
शेतवस्तीवर घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ऋतुजा सचिन करडक वय 3 वर्षे राहणार तांदूळवाडी तालुका गंगापूर असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋतुजा ही आपल्या आई सोबत मामाच्या गावी वळण येथे आलेली होती. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी तिला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सायंकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच मुलीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातच हंबरडा फोडला.
28 वर्षीय युवकाचा आढळला संशयास्पद मृतदेह
यवतमाळच्या बाजार समितीच्या परिसरामध्ये एका 28 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. अक्षय निरंजन शेंडे असे मृत युवकाचे नाव आहे. अक्षय हा बाजार समितीमध्ये हमालीचे काम करीत होता. 27 मार्चला तो कामाला जातो म्हणून घरून निघून गेला होता. दरम्यान अक्षयचा मृतदेहच आढळून आला. दरम्यान या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. त्यामध्ये मृतकाच्या डोळ्याजवळ जखम आढळून आली तसेच खिशामध्ये विषारी औषध आढळून आले. त्यामुळे अक्षयने आत्महत्या केली, की त्याचा घातपात झाला याचा शोध शहर पोलीस ठाणे करीत आहे.