Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रहिप्परगीचे दरवाजे बंद करताच राजापूर बंधारा बुडाला, कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या तक्रारीनंतर...

हिप्परगीचे दरवाजे बंद करताच राजापूर बंधारा बुडाला, कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या तक्रारीनंतर दरवाजे उघडले

कृष्णा नदीवरील कर्नाटकमधील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर त्याची फुग शिरोळपर्यंत आली आहे. राजापूर बंधाराही बुडाला आहे. ही बाब कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली होती.

 

त्यानंतर बुधवारी हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून, कृष्णा नदीची पाणीपातळी शिरोळपर्यंत कमी होऊ लागली आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

 

सर्जेराव पाटील म्हणाले, कृष्णा, वारणा व पंचगंगा या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आल्याने व जास्त पडल्यामुळे नदीपात्र भरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले होते. कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे अलमट्टी आणि हिप्परगी पाणीसाठा ठेवतील त्यावर आमचे लक्ष आहे. परंतु, १५ जूनपासून ही उंची अलमट्टीने पार केली असून, याकडे प्रशासनाचे का लक्ष नाही? वास्तविक, प्रशासनाने यांना खडसावून सांगितले पाहिजे. पावसाच्या सुरुवातीलाच पाणी अडवणे मागील गावांना धोकादायक आहे. हे माहीत असूनसुद्धा अलमट्टी आणि हिप्परगी वेळोवेळी या नियमांचे पालन करीत नाही.

 

हिप्परगी धरणाचे दरवाजे पावसाळ्यात खुले ठेवायचे असतानाही ते बंद करत आहेत. मंगळवारपर्यंत धरणाचे दरवाजे बंद असल्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याची फुग शिरोळ तालुक्यातील नरसोबावाडीपर्यंत आली होती. राजापूर बंधारा पाण्याखाली बुडाला आहे. तसेच सांगली बंधाराही पाण्याखाली गेला आहे. याबाबत सांगली व कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडे केंद्रीय जल आयोगांना लेखी तक्रार कृष्णा महापूर समितीने केली आहे. त्यानंतर आज, बुधवारी हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडले असून, कृष्णा नदीची शिरोळपर्यंतची पाणीपातळी उतरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -