Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! महिला होमगार्डच्या घरातच मटका अड्डा, पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेनंतर कारवाई

धक्कादायक! महिला होमगार्डच्या घरातच मटका अड्डा, पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेनंतर कारवाई

कसबा सांगाव (ता. कागल) येथे महिला होमगार्डने भाडे तत्त्वावर दिलेल्या खोलीतच मटका सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कागल पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कसबा सांगावमध्ये या खोलीवर छापा टाकून सिकंदर कांबळे (रा.कसबा सांगाव) याला ताब्यात घेतले. रोख १७०० रुपये, मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तो मालक सतीश भिंगारे याच्यासाठी मटका घेत होता. यांसह शहरातील शिवाजी पेठ, वडणगे या ठिकाणीही मटका अड्ड्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

 

पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार करण्याचा निर्धार बोलून दाखवला. पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीतून त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली होती. ‘जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार करा’ या पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेनंतर दैनिक ‘सकाळ’ने बाराही तालुक्यांतील अवैध धंद्याची सद्य:स्थिती १९ जूनच्या अंकातून मांडली होती. जिल्ह्यातून या बातम्यांबद्दल सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तर पोलिसांनीही कारवायांचा धडाका सुरू केला आहे.

 

शिवाजी पेठेतील गांधी मैदान परिसरात मटका घेणाऱ्या युवराज राबाडे (रा. गंगावेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६५०० रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. कांतीलाल व्हटकर याच्यासाठी तो मटका घेत असल्याचे चौकशीत समोर आल्याने दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. वडणगे (ता. करवीर) येथे अजित आनंदा गणाचार्य (रा. कसबा बावडा) याच्यावर कारवाई करून रोख १८९५ रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी, विदेशी दारू विकणाऱ्या राहुल हेगडे (रा. कसबा सांगाव) याच्यावरही कारवाई करून दारू साठा जप्त केला.

 

होमगार्डकडूनच बळ?

 

कागल पोलिस ठाण्याकडे वेगवेगळ्या बंदोबस्तात सहभागी होणाऱ्या महिला होमगार्डने स्वतःची खोली मटका व्यावसायिकाला भाड्याने दिली होती. कसबा सांगावमध्ये याची खुली चर्चा असतानाही याकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल उपस्थित होतो. होमगार्ड म्हणून पोलिस ठाण्यात वावरणाऱ्या महिलेने आपल्या पदाचा गैरवापर केला का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. महिला होमगार्डकडून अशा प्रकारांना बळ मिळाले तर कारवाई कोण करणार, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

 

कारवाईच्या सक्त सूचना

 

अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना यापूर्वीही देण्यात आल्या आहेत. मटका, जुगार किंवा अन्य काळे धंदे सुरू असल्यास नागरिकांनी थेट पोलिस नियंत्रण कक्षाकडे तक्रारी कराव्यात. तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -