ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. ही मुलगी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीवरुन घरी परतत असताना तिघांनी तिचे अपहरण केले शहरापासून १०-१५ किमी अंतरावर असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
आरोपींनी तिला मारहाणही केल्याची माहिती समोर आली आहे.
मुलगी जंगलातून पळून जाण्यात कशीबशी यशस्वी झाली पण नंतर ती दुसऱ्या अशाच परिस्थितीत सापडली. ती हल्लेखोरांपासून पळून जात असताना एका ट्रकला तिने हात केला, ट्रक थांबला पण काही अंतरावर गेल्यावर ट्रक चालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. स्थानिक रहिवाशांनी मुलीला ट्रक चालकासोबत संशयास्पद परिस्थितीत पाहिले आणि हस्तक्षेप करून तिची सुटका केली, ज्यामुळे तिचा जीव वाचला.
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी तपास करून ट्रक चालकासह चारही आरोपींना अटक केली. मलकानगिरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) विनोद पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले की, “मलकानगिरी शहरापासून सुमारे १०-१५ किमी अंतरावर असलेल्या जंगलात बलात्काराची पहिली घटना घडली. ट्रक चालकासह चार जण या गुन्ह्यात सहभागी होते, परंतु त्यापैकी तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.”