क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. चार वर्षांच्या संसारानंतर युजवेंद्र व धनश्री वर्मा वेगळे झाले. अखेर युजवेंद्रने त्याच्या घटस्फोटाबद्दल मौन सोडलं आहे.
वैवाहिक जीवनात कोणत्या चुका झाल्या, ते त्याने सांगितलं. तसेच त्याने फसवणूक केल्याच्या चर्चा झाल्या, त्याबद्दलही तो व्यक्त झाला आहे.
युजवेंद्र व धनश्री यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं आणि २०२५ च्या सुरुवातीला ते वेगळे झाले. आता राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत चहलने खुलासा केला की घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याने व धनश्रीने हा निर्णय खासगी ठेवायचं ठरवलं होतं.
“हे सगळं खूप दिवसांपासून सुरू होतं. पण हे सगळं लोकांना दाखवायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. जोपर्यंत या नात्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत नाहीत, तोवर आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही सोशल मीडियावर एका सामान्य जोडप्यासारखे राहू, असं आम्ही ठरवलं होतं,” असं चहल म्हणाला. सगळं सुरळीत चाललंय, असा दिखावा करत होतास का? असं विचारल्यावर चहलने होकार दिला.
दोघेही आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअरवर खूप लक्ष केंद्रित करत होते, त्यामुळे ते नात्याला प्राधान्य देऊ शकत होते. परिणामी दोघांमधील भावनिक दुरावा वाढत गेला. नात्यांमध्ये तडजोड करावी लागते, असं युजवेंद्रने सांगितलं.
नातं म्हणजे तडजोड – युजवेंद्र चहल
“नातं ही तडजोड असते. जर एकाला राग आला तर दुसऱ्याला ऐकावं लागतं. कधीकधी दोन लोकांचे स्वभाव जुळत नाहीत. मी भारताकडून खेळत होतो, तीही तिचं काम करत होती, असंच १-२ वर्षे चालू होते. त्या वेळी मला नात्यात वेळ द्यावा लागत होता, खेळातही वेळ द्यावा लागत होता. मी नात्याबद्दल विचार करू शकत नव्हतो. मग रोज तुम्हाला असं वाटतं की काहीतरी सोडून द्यावं. खरं तर दोन महत्त्वाकांक्षी लोक एकत्र राहू शकतात. कारण प्रत्येकाचं स्वतःचं वेगळ आयुष्य असतं, प्रत्येकाची वेगळी ध्येये असतात. एक जोडीदार म्हणून, तुम्हाला पाठिंबा द्यावा लागतो. तुम्ही १८-२० वर्षांपासून एखाद्या गोष्टीसाठी काम करत आहात, तर तुम्ही ते नात्यासाठी सोडू शकत नाही,” असं चहल पुढे म्हणाला.
मी कधीच कुणाचीही फसवणूक केली नाही – युजवेंद्र चहल
घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान चीटर म्हटलं गेलं, त्यावरही चहलने प्रतिक्रिया दिली. “जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा लोकांनी माझ्यावर फसवणूकीचे आरोप केले. मी माझ्या आयुष्यात कधीही फसवणूक केलेली नाही. मी असा माणूस नाही. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रामाणिक व्यक्ती भेटणार नाही. मी माझ्या जवळच्या लोकांंचा खूप विचार करतो. मी त्यांच्याकडून जमेल ते सगळं करतो. काहीच माहित नसूनही लोक मला दोष देत राहतात, तेव्हा तुम्ही वेगळे विचार करू लागता,” असं युजवेंद्र चहल म्हणाला.
“मला दोन बहिणी आहेत, मी त्यांच्याबरोबर वाढलोय. महिलांचा आदर कसा करायचा ते मला माहीत आहे. माझ्या आई-वडिलांनी मला महिलांचा आदर करायला शिकवलंय. माझ्या सभोवताली असलेल्या लोकांकडून मी खूप गोष्टी शिकले. माझं नाव व्ह्यूजसाठी कुणाशी तरी जोडलं जातंय, त्याचा अर्थ मी तसाच आहे, असं नाही,” असं चहलने स्पष्ट केलं.
मला आत्महत्येचे विचार यायचे – युजवेंद्र चहल
वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि लोकांच्या नकारात्मक टिप्पण्या याचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला, असं युजवेंद्रने नमूद केलं. “मला आत्महत्येचे विचार यायचे. मी माझ्या आयुष्याला कंटाळलो होतो, मी दोन-दोन तास रडायचो. मी फक्त २ तास झोपायचो. असं जवळपास ४०-४५ दिवस सुरू होतं. मला क्रिकेटमधून ब्रेक हवा होता. मी क्रिकेटमध्ये खूप व्यग्र होतो. मी लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी फक्त २ तास झोपायचो. मला आत्महत्येचे विचार यायचे ते मी माझ्या मित्राबरोबर शेअर करायचो. मला खूप भीती वाटायची,” असं युजवेंद्र चहल म्हणाला.