आयपीएल 2026 अर्थात 19 व्या पर्वापूर्वी काही संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सध्या ट्रेड विंडोचा पर्याय खुला आहे. तर डिसेंबर जानेवारी महिन्यात मिनी लिलाव होऊ शकतो. तत्पूर्वी काही खेळाडूंची ट्रेड विंडोच्या माध्यमातून देवाणघेवाण होऊ शकते.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनबाबत चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्याबाबत चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेनुसार, संजू सॅमसन पुढील महिन्यात वेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळताना दिसू शकतो.
चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन्ही संघात करार होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
क्रिकबझने संजू सॅमसनच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वृत्त दिले आहे की, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसनने राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला याबाबत औपचारिक माहिती दिली आहे. ट्रेड विंडो किंवा मिनी लिलावासाठी संघातून मुक्त होण्याची विनंती केली आहे.सोशल मीडियावर उडालेल्या अफवेनुसार, संजू सॅमसन आणि फ्रँचायझी व्यवस्थापनात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे संजू सॅमसनने संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या पर्वात असं काही घटना घडल्या की त्यामुळे त्याची नाराजी आहे
संजू सॅमसन गेल्या 8 पर्वापासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. संजूने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि सलग तीन हंगामात संघाकडून खेळला. त्यानंतर फ्रँचायझीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. तेव्हा संजू 2016 आणि 2017 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला राजस्थान रॉयल्स संघावरील बंदी उठवल्यानंतर संजू 2018 मध्ये पुन्हा संघात सामील झाला. तेव्हापासून संघाचा भाग असलेल्या संजूने 2021 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 14 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.