प्रधानमंत्री किसान (Kisan)सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा 20 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. मूळत: हा हप्ता जूनमध्ये येणे अपेक्षित होता, मात्र तांत्रिक कारणांमुळे तो जवळपास दोन महिने उशिरा आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये 21 व्या हप्त्याबाबत उत्सुकता आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, दर चार महिन्यांनी हप्ता वितरित केला जातो. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये आला होता, त्यानुसार 20 वा हप्ता जूनमध्ये येणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात तो ऑगस्टमध्ये आल्याने, 21 वा हप्ता ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. नेमकी तारीख जूनच्या नियोजनानुसार की ऑगस्टच्या प्रत्यक्ष तारखेनुसार ठरते, यावर हे अवलंबून आहे.
काही दिवसांपासून चर्चा होती की सरकार या योजनेतून मिळणारी वार्षिक आर्थिक मदत वाढवणार आहे. मात्र कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत स्पष्ट केले की, सध्या हप्त्याची रक्कम वाढवण्याचा कोणताही विचार नाही. आतापर्यंत 20 हप्त्यांमधून 3.9 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या (Kisan)खात्यात जमा झाले आहेत. फक्त 20 व्या हप्त्यातच 9.7 कोटी शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपये थेट दिले गेले आहेत.
पुढील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते व आधार तपशील अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. तसेच, ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास रक्कम वितरणात अडथळे निर्माण होऊ शकतात.
ई-केवायसी करण्याची पद्धत
अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या.
“फार्मर्स कॉर्नर” मध्ये “eKYC” पर्याय निवडा.
आपला आधार क्रमांक टाइप करून “सर्च” क्लिक करा.
आधारशी जोडलेल्या मोबाइलवर आलेला OTP एंटर करा.
पडताळणी पूर्ण झाल्यावर e-KYC यशस्वी होईल.
मोबाइल नंबर आधारशी लिंक नसेल, तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करा.
पीएम किसानचा 21 वा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. रक्कम वाढवण्याचा विचार सध्या नाही, मात्र कागदपत्रे व e-KYC वेळेत पूर्ण केल्यास हप्ता मिळण्यात विलंब होणार नाही.