Sunday, August 24, 2025
Homeब्रेकिंगकुठे पूल कोसळला, तर कुठे बसला आग; गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांवर विघ्न

कुठे पूल कोसळला, तर कुठे बसला आग; गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांवर विघ्न

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात कामानिमित्त आलेले चाकरमानी हे कोकणात गणपतीसाठी निघाले आहे. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाला आता अनेक अडथळे येऊ लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे लाखो चाकरमानी रेल्वे, बस आणि रस्तेमार्गे कोकणात आपल्या गावी परतत आहेत. मात्र, प्रवासादरम्यान त्यांना अनेक विघ्नांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा कोकणात परतण्याचा प्रवास त्रासदायक बनला आहे.

 

चिपळूणमध्ये पूल कोसळला

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात खडपोली एमआयडीसीकडे जाणारा एक जुना पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हा पूल १९६५ च्या सुमारास बांधण्यात आला होता. पण तो जीर्ण झाल्यामुळे कोसळला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या पुलाच्या दुर्घटनेमुळे पिंपळी-खडपोली-दसपटी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. हा पूल पुन्हा नवीन बांधण्यासाठी एमआयडीसीकडे प्रस्तावही देण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत चाकरमान्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

 

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि कोकण विशेष एक्सप्रेससारख्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात कोकणवासीय प्रवास करतात. मात्र, या गाड्यांमध्ये इतकी गर्दी झाली आहे की प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही.

 

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अनेकांनी तर आपल्या कुटुंबासह लहान मुलांसह फलाटावरच बस्तान मांडले आहे. काही प्रवासी तर तब्बल २५ तासांपासून ठाणे स्थानकात येऊन रांग लावल्याचे समोर आले आहे. रेल्वेने रांगेची जबाबदारी आरपीएफकडे दिली असली तरी, प्रवाशांना सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. ज्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.

 

कशेडी बोगद्याजवळ खासगी बसला आग

गणेशोत्सवासाठी मुंबईहून मालवणला निघालेल्या खासगी लक्झरी बसला रविवारी पहाटे रत्नागिरीतील कशेडी बोगद्याजवळ भीषण आग लागली. या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी होते. बसचा टायर जास्त गरम झाल्याने त्याने पेट घेतला आणि ही आग वेगाने पसरली. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली आणि प्रवाशांचे सर्व सामानही जळाले. यानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -