मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात शड्डू ठोकून बसलेले मनोज जरांगे पाटील यांना आता मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आझाद मैदानातील आंदोलन थांबवा, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी रात्रीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला ही नोटीस पाठवल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान (Azad Maidan) खाली करण्यास सांगितले आहे किंन नाही, याबाबत संभ्रम आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांच्याकडून घालून देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनासाठी परवानग्या नाकारण्यात आल्याचे पोलिसांच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसनंतर मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीचे सदस्य चंद्रकांत भराट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आझाद मैदानात फक्त 5 हजार मराठा आंदोलक असतील, हे आम्हाला मान्य आहे. पण बाकीचे मराठा आंदोलक कुठे बसवायचे? सरकारने मराठा आंदोलकांचं खाणं-पिणं बंद केलं, मग त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ घेऊन गाड्या आल्या. हे सगळं खाणार कुठे रस्त्यावरच ना? आता सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे. गेल्यावर्षी 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीत पोलिसांनी आमच्यावर हल्ला केला तसं इकडेही करायचं असेल. पण आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असे चंद्रकांत भराट यांनी म्हटले.



