अंबाबाई मंदिरात यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि दर्शनाची रांग सुलभ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवरात्रौत्सवात प्रथमच एआय तंत्र वापरले जाणार असून भोपाळ येथील आयआयटी तज्ज्ञांच्या समितीने या तंत्रज्ञानाची रचना तयार केली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवकाळात विविध धार्मिक विधी व सोहळे होतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथून सरासरी 25 लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, गर्दीचा ताण आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आव्हान उभे राहते. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या सर्वांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे.
एआयमुळे काय होणार?
या प्रणालीद्वारे दर्शन रांगेत पहिल्यांदा उभा असलेला भाविक मंदिरात दर्शन घेऊन किती वेळात बाहेर पडतो याची नोंद होणार आहे. त्यामुळे रांग रेंगाळण्याचे प्रकार कमी होऊन गर्दीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल. याशिवाय फेस रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गर्दीत फिरणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे संशयित वा चोरीच्या उद्देशाने आलेले लोक यांच्यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. अशा प्रकारे भाविकांच्या सुरक्षेबरोबरच चोरी वा गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.