गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली आहे. आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या सुरू असलेल्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती ओबीसी समाजाला वाटत आहे. याच भीतीमुळे एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भरत महादेव कराड (३५) असे या तरुणाचे नाव आहे. ते लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात राहत होते.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भरत कराड हे गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाबद्दल चिंतेत होते. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या सुरू असलेल्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती त्यांना वाटत होती. ते फारसे शिकलेले नव्हते. त्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्याची त्यांना विशेष काळजी होती. आपल्या मुलामुलींना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, या विचाराने ते निराश झाले होते. याच निराशेपोटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय?
मी भरत महादेव कराडे आताच महाराष्ट्र सरकारने समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरुपी आरक्षण संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करुन ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी जीवन कायमस्वरुपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
भरत कराड यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, आई-वडील आणि तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाकडे केवळ दोन एकर जमीन आहे. अशा परिस्थितीत, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना आरक्षणाची मोठी आशा होती. मात्र, ही आशा संपुष्टात येत असल्याचं वाटल्याने त्यांनी आत्महत्या केली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आता ओबीसी आरक्षणाचे प्रमुख नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे लातूरला येऊन आत्महत्याग्रस्त भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. लातूर विमानतळावर आगमन झाल्यावर ते थेट रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात जाऊन कराड कुटुंबीयांचं सांत्वन करतील.