अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला. काजल प्रशांत एडके (वय 28, रा. शांतिनगर, सांगली. माहेर मलकापूर, जि. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
खुनानंतर संशयित पती प्रशांत एडके (वय 35) पोलिसांत स्वतःहून हजर झाला. सांगलीतील शांतिनगर येथे रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
एडके दाम्पत्यामध्ये काही महिन्यांपासून कौटुंबिक व अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद सुरू होता. रविवारी सकाळी काजल घरातील सर्व कामे आवरून अकराच्या सुमारास विश्रांती घेत होत्या. त्यावेळी प्रशांतही घरीच होता.या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून संशयिताने रागाच्या भरात धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वर्मी वार केले. यामध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर पतीने थेट शहर पोलिस ठाणे गाठले. घटना समजल्यावर पोलिसही थक्क झाले. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.तोपर्यंत काजलचा अतिरक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तो सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलिस उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी भेट दिली.
पत्नी झाली होती बेपत्ता
काजल काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पती प्रशांतने शहर पोलिसांत तशी तक्रार दिली होती. त्यानंतर तिचा शोध घेतला होता व तिला परत आणले होतेे. नातेवाईक आणि पोलिसांनी दोघांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ही शिष्टाई सफल झाली नाही.
रात्री संसाराच्या गप्पा…सकाळी टोकाचे पाऊल
बेपत्ता काजलला पोलिसांनी शोधून आणल्यानंतर ती माहेरी गेली होती. तिला प्रशांतने समजूत घालून शनिवारी घरी आणले होते. रात्री दोघांंनीही लेकरांसाठी एकत्र संसार करण्यासंदर्भात हितगूज केल्याचे त्यांच्या जवळच्या लोकांकडून कळाले. त्यांच्यात सकाळी मात्र पुन्हा वाद झाला आणि संशयिताने टोकाचे पाऊल उचलले.
मारले, वाट पाहिली, मग पोलिस ठाणे गाठले
प्रशांतने काजलचा गळा चाकूने चिरताच ती तडफडू लागली. तिची तडफड शांत होईपर्यंत तो तेथेच बसून होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर तो घराला कडी लावून बाहेर पडला. त्याने चाकू शेजारील पाण्याच्या टाकीजवळ टाकला आणि पोलिसात हजर झाला.
दोन चिमुरड्यांचे मायेचे छत्र हरपले
काजल आणि प्रशांत यांचे भाड्याचे घर आहे. त्यांना सहा आणि चार वर्षांची अशा दोन मुली आहेत. आईचा मृत्यू झाला आणि वडील कारागृहात गेले. त्यामुळे या दोन्ही चिमुरड्यांचे मायेचे छत्र हरपले .
