महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदवार्ता! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात(account) जमा होऊ लागला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर मिळालेल्या या १५०० रुपयांच्या हप्त्यामुळे राज्यातील महिलांची दिवाळी अधिक उजळणार आहे. सरकारने सप्टेंबर महिन्यासाठीचा निधी वर्ग केला असून, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तटकरे यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ फक्त E-KYC पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सर्व लाभार्थ्यांनी पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
या योजनेचा आर्थिक भार शासनावर वाढत असला तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला आहे.मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना आणि राज्य निवृत्त वेतन योजना यांच्या लाभार्थ्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी ४१०.३० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. हा निधी विशेषतः अनुसूचित जाती घटकांतील पात्र लाभार्थ्यांसाठी वितरित केला जाणार आहे.या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलला आहे, आणि ‘लाडकी बहीण’ योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे बळ ठरत असल्याचे चित्रक दिसत आहे




