Wednesday, November 12, 2025
Homeब्रेकिंगअभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक, व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक, व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती

हिंदी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेले काही दिवस धर्मेंद्र यांची तब्येत खालावलेली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेकीखाली ठेवण्यात आले आहे.

 

धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीचं सातत्याने निरीक्षण करत आहे. धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयातत दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

दरम्यन, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज (१० नोव्हेंबर रोजी) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचंही सांगितलं जात आहे. धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी किंवा रुग्णालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. याच वर्षी एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्यांचीसुद्धा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची दृष्टी कमी झाल्याने डोळ्यांच्या कॉर्निया ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्यावर मोतीबिंदूचीही शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा मुंबईतील रुग्णालयाबाहेर येताना त्यांचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘माझ्यात खूप दम आहे. अजूनही मी ठीक आहे’, असं ते पापाराझींना या व्हिडीओत म्हणताना दिसले होते.

 

धर्मेंद्र सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. वयाच्या ८९ व्या वर्षीही अभिनयावरचं त्यांच प्रेम कायम आहे. नुकतंच त्यांना कृती सेनन आणि शाहिद कपूर यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात काम केलं होतं. लवकरच ते ‘इक्कीस’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात ते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्यांचा ‘अपने २’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

 

धर्मेंद्र यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. अनेक दशके त्यांनी सिनेविश्वात काम केलं आहे. ६०-७० च्या दशकात बॉलिवूडमधील आपला काळ त्यांनी चांगला गाजवला होता. वयोमानानुसार त्यांना आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. धर्मेंद्र यांनी लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -