इचलकरंजी शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. तिघांपैकी दोन मुली शाळेला जातो, असे सांगून एकत्रित बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
तिन्ही मुलींचा विविध पथकांद्वारे शोध घेण्यात येत आहे.
शहरातील एकाच शाळेत 10 वी मध्ये शिकत असलेल्या 14 वर्षीय दोन मुली शाळेला जातो, असे सांगून शनिवारी सकाळी बाहेर पडल्या होत्या. त्या परतल्या नाहीत. नातेवाईकांनी शाळेत चाौकशी केली असता दोन्ही मुली शाळेत न आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्या बेपत्ता झाल्याची वर्दी दिली. शाळेच्या गणवेशातच शहरातील एका मुख्य चौकातून त्या एकत्रित निघून गेल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.
गेल्या दोन दिवसांपासून या मुलींचा शोध सुरू आहे. दरम्यान, शहरातील आणखी एका भागातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलगीही बेपत्ता झाली आहे. दुकानापासून जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिन्ही मुलींबाबत माहिती असल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गावभागचे पो.नि. महेश चव्हाण यांनी केले आहे. स. पो. नि. पूनम माने व उपनिरीक्षक गोविंद कोळेकर यांच्या पथकांकडून मुलींचा शोध घेण्यात येत आहे. तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.



