कुरुंदवाड परिसरात रविवारी सकाळी भानामती आणि करणी-जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला. शहराच्या विविध वेशींवर आणि चौकांत कापडात गुंडाळून ठेवलेले संशयास्पद साहित्य नागरिकांच्या निदर्शनास आले.
या कापडात माती, हळद-कुंकू, तांदूळ, भिजवलेला हरभरा, खाऊची पाने, काळा दोरा आणि इतर साहित्य आढळून आले.
शहरातील विविध भागांत एकाच वेळी असे साहित्य आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेला तोंड फुटले आहे. सोमवारपासून नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काहीजणांनी या प्रकाराला अंधश्रद्धा पसरवून मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न असल्याची मते व्यक्त केली.
यापूर्वीही अशाच स्वरूपाचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी शिरढोण रस्त्यावर घडला होता. त्यावेळी कुरुंदवाड नगरपालिकेतील 20 नगरसेवक संख्या असल्याने 20 बाहुल्यांची भानामती आणि करणीचा उतारा टाकण्यात आला होता. त्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तपास केला होता; मात्र हाती काहीही लागले नाही.
नागरिकांत संताप अन् भीतीही
शहरात अशा घटनांनी पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये संतापासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही इच्छुक उमेदवारांनी हे राजकीय कटकारस्थान असून मतदारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात राजकीय चर्चेला जोर आला असून सोशल मीडियावर दिवसभर याची चर्चा रंगली होती.



