केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.या याचिकेवर आजपासून (दि. १२ नोव्हेंबर) सलग अंतिम सुनावणी आज होणार होती. मात्र आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
शिवसेना- राष्ट्रवादी कायदेशीर मुद्दे समान
एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी शिवसेना (यूबीटी) ने दाखल केलेली याचिका आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना अधिकृत चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यासही खंडपीठाने सहमती दर्शवली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) चिन्ह वाद प्रकरणांमधील कायदेशीर मुद्दे समान आणि एकमेकांवर अवलंबून असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली. खंडपीठाने सांगितले की ते २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता हा मुद्दा घेतील. न्यायमूर्ती कांत यांनी न्यायालयाच्या प्रमुखांना २२ जानेवारी रोजीही कोणतेही महत्त्वाचे विषय पोस्ट करू नयेत असे निर्देश दिले, जेणेकरून गरज पडल्यास सुनावणी दुसऱ्या दिवशी सुरू राहू शकेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
मागील सुनावणी काय झालं?
शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एनके सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. कृपया लवकरात लवकर सुनावणी घ्या. कारण हा पक्ष नाव आणि चिन्हाचा प्रश्न आहे, अशी विनंती यावेळी ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी आम्हाला युक्तीवादासाठी तीन दिवस हवे असल्याचे सांगितले होते. तर कपिल सिब्बल यांनी मलाफक्त ४५ मिनिटे युक्तीवादासाठी हवी आहेत, असे सांगितले. एकूणच पुढील तीन दिवस सलग सुनावणी घेण्यापेक्षा आता १२ नोव्हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले होते.
शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई
केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले होते. पक्ष नाव आणि चिन्ह यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात गेली दोन वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन लढाई सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाने जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पक्ष नाव आणि चिन्हा निर्णयासंदर्भात अंतरिम अर्ज केला होता. यामध्ये महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाला पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावर ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार होती. मात्र ती लांबणीवर पडली. यानंतर ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी १२ नोव्हेंबरपासून आम्ही सलग सुनावणी घेवून या प्रकरणाचा निकाल देऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले होते.



