गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून दाम्पत्यावर एडक्याने हल्ला करणाऱ्या चौघांना शिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कागल येथून ताब्यात घेतले.3 सप्टेंबरला विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादानंतर संशयितांनी याच कारणावरून दिगंबर कांबळे आणि त्यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली
3 सप्टेंबर रोजी कोरगावकर कॉलनी परिसरातून गणेश विसर्जन मिरवणूक जात होती. त्यावेळी दिगंबर कांबळे व संशयितांमध्ये किरकोळ वाद झाला होता. हा वाद काही क्षणात मिटला असला, तरी संशयितांनी हा राग मनात धरून ठेवला. मंगळवारी रात्री त्यांनी याच पूर्ववैमनस्यातून दिगंबर कांबळे यांच्यावर एडक्याने हल्ला केला.
मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता दिगंबर कांबळे, पत्नी आरती आणि मुलगा वल्लभ हे श्रीराम स्वीट मार्टजवळून फिरत घरी जात होते. दांपत्य निवांत चालत असतानाच टोळक्याने अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी आधीपासूनच दबा धरून बसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अचानक हल्ला; दिगंबर कांबळे गंभीर जखमी
टोळक्यातील वैभव राजू बेडेकर (24), साहिल अरुण बनगे (22), साहिल चंद्रकांत शिद्रुक (21) आणि अल्पवयीन आर्यन अनिल शिंदे (18) यांनी हातातील एडक्याने दिगंबर कांबळे यांच्यावर वार केले. दिगंबर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते.
मारामारीच्या वेळी दिगंबर यांची पत्नी आरती कांबळे मध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही क्षण गोंधळ निर्माण झाला. मात्र आरोपी चारचाकीत बसून पसार झाल्यामुळे नागरिकांना काहीच समजत नव्हते.
पोलिसांची शिताफी; चारही आरोपी कागलमधून ताब्यात
घटनेनंतर शिरोली पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार तसेच संशयितांच्या परिचितांकडून माहिती घेऊन पोलिसांनी आरोपींचा माग काढला. चौघेही कागल येथे लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली.
बुधवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता शिरोली पोलिसांच्या पथकाने कागलमध्ये धाड टाकून चौघांना ताब्यात घेतले. घटनेनंतर पळ काढल्यामुळे पोलिसांवर दबाब वाढला होता, मात्र वेळेत कारवाई करून पोलिसांनी तणाव कमी केला.
पूर्ववैमनस्यामुळेच हल्ला – पोलिसांचा प्राथमिक अंदाज
पोलिसांनी सांगितले की हा हल्ला पूर्णपणे पूर्ववैमनस्यातून झाला असून चौघांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात येईल. दिगंबर कांबळे यांच्यावर झालेला हल्ला नियोजित असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संशयितांनी हल्ल्यात वापरलेले एडक तसेच पळून जाण्यासाठी वापरलेली चारचाकी याबाबतही तपास सुरू आहे.




