महाराष्ट्रात दोन ठाकरे एकत्र येण्याची हलगी वाजत आहे. पुन्हा पवार चुलते-पुतणे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. हे लोण आता राज्याच्या राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही.
जिल्हा-तालुक्यात खेडोपाडी कोण पक्षाला केव्हा सोडचिठ्ठी देतो, केव्हा स्वगृही परततो याचा नेम नाही. यामध्ये वैचारिक भूमिका, पक्षनिष्ठा यांची अवस्था कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्यापेक्षा वेगळी नाही.
मात्र, दरम्यानच्या कालावधीत परस्परांवर जी विखारी टीका होते, कलगी-तुरे रंगतात, रस्त्यांवर संघर्ष होतो, ज्यांची डोकी फुटतात आणि शेकडो गुन्हे दाखल होतात, त्या कार्यकर्त्यांना वाली कोण? कारण, नेते सत्तेसाठी एकमेकांच्या तोंडात चिमूटभर साखर घालून रिकामे होत असले तरी महाराष्ट्रात सध्या कार्यकर्त्यांच्या पार्श्वभूमीवर कोण, कोणासाठी आणि कोणाविरुद्ध लढतो आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सत्तेसाठी वैचारिक भूमिका, पक्षनिष्ठा यांना काडीमोड घेण्याची बीजे इथेच रोवली गेली होती. या बीजांचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि राजकीय पक्षामागे वैचारिक भूमिका व निष्ठा असण्याची आवश्यकता नाही, असा आता रिवाजच झाला आहे. महाराष्ट्रात 1966 साली मराठी माणसांच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेली शिवसेना 1991 मध्ये फोडण्याचे श्रेय पवारांकडेच जाते.
भुजबळांना बाहेर काढून पवारांनी सेनेला धक्का दिला. त्याच सेनेला मांडीवर घेऊन पवारांनी महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसवून प्रायश्चित्तही घेतले. मग शिवसेना नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या बंडानेही फुटली. पुढे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढून चुलत्याच्याच शिवसेनेविरुद्ध जसा शड्डू ठोकला तसे अलीकडच्या काळात बारामतीच्या पुतण्याने चुलत्याची मांडी सोडून भाजपच्या ओट्यात जाणे पसंत केले.
दोघांचे मावळे परस्परांना भिडले त्यांचे काय?
आता कागलमध्ये नवे आवर्तन आले आहे. एकेकाळी मंडलिकांचे सरसेनापती म्हणून आणि नंतर मंडलिकांचे कडवे शत्रू म्हणून वावरणारे राज्याचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी विक्रमसिंह घाटगे यांचे चिरंजीव समरजितसिंह घाटगे यांनी परस्परांच्या गळ्यात गळा घातला आहे. हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे कागलच्या रणांगणात सतत शड्डू ठोकून उभे राहिले. मुश्रीफांना पराभूत करण्यासाठी भाजपने समरजितसिंहांच्या पाठीवर लाल माती टाकली.
पक्षाचा लंगोट बांधला आणि राज्यात सत्तेची अपरिहार्यता निर्माण झाल्यावर भाजपने मुश्रीफांना सरदारकीची जहागिरी दिली आणि समरजितसिंह एकाकी पडले. ते राष्ट्रवादीत गेले; पण फडणवीस प्रेमाने अस्वस्थ होते. आता मनोमिलनाचा बार उडतो आहे. पण, या दोघांचे जे मावळे परस्परांना भिडले त्यांचे काय?
पक्ष बदलले; पण कोर्टाची फेरी चुकत नाही
राजकारणातील संघर्ष कडवा असतो. 1970 च्या दशकात शेतकरी कामगार पक्षाचा कडवा कार्यकर्ता इतका निष्ठावान की, मृत्यूनंतर सरणावर मृतदेहावरील लाल टोपी काढायची नाही, असा त्याचा निर्धार होता. काँग्रेसचे श्रीपतराव बोंद्रे शेकापच्या बालेकिल्ल्यातून बाहेर पडेपर्यंत गांधी टोपी विजारीच्या खिशात ठेवत होते.
पण, नगरपालिकेत गेल्यानंतर गांधी टोपी आणि काँग्रेसचा विचार त्यांनी सोडला नाही. राजकारणातील संघर्षात अनेक कार्यकर्त्यांची डोकी फुटली, घरे-दारे उद्ध्वस्त झाली, पिढ्या मागे पडल्या, पोरे-बाळे तुरुंगात गेली, शेकडो गुन्हे दाखल झालेत. पक्ष बदलले पण कोर्टाची फेरी चुकत नाही, अशी अवस्था आहे. यामुळेच पुरोगामी महाराष्ट्रात कोण, कोणासाठी आणि कोणाविरुद्ध लढतो आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.




