मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनेकदा उपोषण केलं, अखेर मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, सरकारने राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटला परवानगी दिली. राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढताना दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना आता थेट राजकीय पक्षाकडून अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे.
स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आता थेट आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिलं होतं. तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाची सर्व समाजाच्या घटकांना गरज असल्याचं देखील मी त्यांना म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या 18 पगड जातीला तुमची गरज आहे, अशी माझी त्यांना विनंती असून स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद द्यायला मी त्यांना तयार आहे, असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे नव्हे तर मी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा घेऊन पुढे जात आहे, तो माझ्याकडे आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय करतायेत हे तुम्ही सर्व बघत आहात. गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र सायकलवर फिरून संघर्ष केला, त्याच पद्धतीने मी एकटी महिला असून देखील महाराष्ट्र फिरते आहे. वाल्मीक कराड प्रकरणामध्ये आमच्या पूर्ण घराण्याची आणि आमच्या कुळाची बदनामी झाली आहे. असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपावर देखील जोरदार टीका केली आहे.



