जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 800 सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर राहणार आहे. दोनपेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.
त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू असून काही हद्दपारीचे प्रस्तावही तयार करण्यात येत आहेत. तसेच परवानाधारकांची शस्त्रे स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करून घेतली जात आहेत. अवैध धंदे सुरू राहणार नाहीत, याची घबरदारी घ्या, अशा सूचना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका, महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर नजर आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक करवाई सुरू आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार आणि काही सराईतांकडून चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. यापुर्वी निवडणुकीत गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. करवीरमधील 328, जयसिंगपुरातील 202, इचलकरंजीतील 119, गडहिंग्लजमधील 83 आणि शाहूवाडी उपविभागातील 64 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यात 6,887 शस्त्रे जमा
जिल्ह्यात एकूण 7 हजार 117 परवानाधारक शस्त्रे आहेत. यापैकी 6,887 शस्त्रे स्थानिक पोलीस ठाण्यात जमा झाली आहेत, तर 230 शस्त्रे जमा होणे बाकी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातील शस्त्रे जमा करून घेतली जात आहेत.
…तर प्रभारी अधिकार्यांवर कारवाई
आचारसंहिता काळात जिल्ह्यात कोणतेही अवैध व्यवसाय सुरू राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शनिवारी होणार्या क्राईम मिटिंगमध्ये आढावा घेतला जाणार आहे. यावेळी अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित प्रभारी अधिकार्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.




